Madhya Pradesh: भाजपा कार्यकर्त्याच्या कानशिलात मारलेली; महिला जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:37 PM2020-03-25T12:37:12+5:302020-03-25T12:42:22+5:30
राजगढ जिल्ह्यातील ब्यावरामध्ये १९ जानेवारीला नागरिकता संशोधन कायदा सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली होती.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सपा, बसपाच्या आमदारांच्या मदतीने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांनी महानगरपालिका आयोगाची सर्व राजकीय नामनिर्देशने रद्द केली आहेत. याचबरोबर चौहान यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात मारणाऱ्या राजगढच्या जिल्हाधिकारी निधि निवेदिता आणि एसडीएम प्रिया वर्मा यांची बदली केली आहे. याशिवाय रीवा नगर पालिकेचे आयुक्त सभाजीत यादव यांनाही हटविले आहे.
निधी यांनी जानेवारीमध्ये सीएएच्या समर्थनार्थ भाजपाने काढलेल्या मोर्चामध्ये प्रिया वर्मा यांच्याशी वाईट वागणाऱ्या भाजपाच्या नेत्याच्या कानशिलात हाणली होती. यामुळे वाद निर्माण झाल्याने शिवराज यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर सरकारच्या समर्थनात काम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांचे सरकार य़ेताच शिवराज यांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.
काय होते प्रकरण
राजगढ जिल्ह्यातील ब्यावरामध्ये १९ जानेवारीला नागरिकता संशोधन कायदा सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी तेथे एका भाजपाच्या कार्यकर्त्याला जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांनी थोबाडीत मारली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आंदोलक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याचवेळी उप जिल्हाधिकारी प्रिय़ा वर्मा यांची आंदोलकांबरोबर धक्काबुक्कीही झाली. यामुळे निवेदिता यांनी पोलिस उपनिरिक्षकाच्याही कानाखाली मारले होते. तपासामध्ये ही तक्रार खरी असल्याचे पुढे आले.
यानंतर शिवराजसिंह यांनी ट्विट करत आरोप केले होते. राजगढ जिल्हाधिकाऱ्यांनी सीमा ओलांडली असून आधी संसदेत बनलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ निघालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारले. नंतर त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्यालाही मारले. कमलनाथ यांना माझा प्रश्न आहे की त्यांना वाचविणार की कारवाई करणार?
महिला अधिकाऱ्याचे कपडे फाडायचा प्रयत्न
प्रिया यांनी बचावावेळी सांगितले की, आंदोलकांनी दंगा सुरु केला होता. त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी आणि माझे कपडे ओढायला सुरुवात केली होती. आम्ही त्यांना पोलिस ठाण्यामध्ये येण्याची सूचना करत होतो. मात्र, ते झटके देऊन पळून जात होते. कोणीतरी पाठीमागून माझ्यावर जोरात लाथ मारली. लोकांना मी तरीही तिथेच बसण्यास सांगितले. ते बसलेही. परंतू एक व्यक्ती शिव्या घालत मागून धावत आला. त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, त्याने अपशब्द वापरल्याने त्याला कानशिलात हाणले. यानंतर लोकांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.