इंदूर : मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री तुलसी सिलावट यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याने ते चर्चेत आले आहेत. सांवेरमधील चर्चेदरम्यान ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशचे मुख्यंत्री होतील, असे वक्तव्य तुलसी सिलावट यांनी केले आहे. तसेच, १५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे हे भूमिपूजनालाही येतील असा दावा केला आहे.
तुलसी सिलावट यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने यावरून चिमटा काढला आहे. काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या माजी आमदारांसोबत अशीच डील झाली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, याआधी तुलसी सिलावट यांनी पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देशावरील कलंक असल्याचे वक्तव्य केले होते.
इंदूरमधील सांवेर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीत असलेले ज्योतिरादित्य शिंदे समर्थक मंत्री तुलसी सिलावट यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर ज्योतिरादित्य शिंदे हे सांवेरमध्ये भूमिजनाला येणार असल्याचे तुलसी सिलावट यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे राजीनामा देणार आहेत, असा टोला लगावला आहे.
तुलसी सिलावट वक्तव्यानंतर काँग्रेसचे राज्य सचिव राजेश यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि प्रेस नोट जारी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोना झाल्यामुळे त्यांचा राजीनामा निश्चित आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील आणि ते १५ दिवसांत सांवेरमध्ये भूमिपूजनाला येणार आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय, तुलसी सिलावट यांनी घोषणा केली, त्यावेळी इंदूर भाजपामधील अनेक मोठे नेते उपस्थित होते. मात्र, कुणीही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या बाजूने आवाज उठवला नाही. भाजपाचे सर्व जुने नेते आता सतरंजी उचलण्याचे काम करत आहेत, अशी टीकाही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
जवळपास दोन महिन्यांपासून शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपा आमदारांचे मन वळण्यात येत आहे. भाजपा नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदेसोबत आहे, अशा विश्वास त्यांना दिला जात आहे. शिवराजसिंह चौहान यांच्यामुळे भाजपा निवडणूक जिंकू शकत नाही. यामुळे ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती सूत्र देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे पोटनिवडणुका टाळल्या जात आहेत. विश्वासघात करणाऱ्यांना साथ देणारे शिवराजसिंह चौहान यांचाही आता विश्वासघात होणार आहे, अशी टीका काँग्रेस सचिव राकेश यादव यांनी केली आहे.
दरम्यान, तुलसी सिलावट यांची जीभ घसरल्यानंतर काँग्रेसने केलेल्या या दाव्यामध्ये किती सत्य आहे, यासंदर्भात आता काहीच बोलता येणार नाही. कारण, भाजपा नेतृत्वामध्ये बदल होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. मात्र, तुलसी सिलावट यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.