भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेत शनिवारी अक्षरश: रणकंदन झाले. भाजपच्या काही आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाकडे चप्पल, ईअरफोन व कागदे फेकल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला.सभागृहात विनाचर्चा काही मिनिटांतच ओडिशा लोकायुक्त (दुरुस्ती) विधेयकाला घाई-गडबडीने मंजुरी दिल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष एस. एन. पात्रो यांनी यापूर्वी खाणकर्मातील भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने दिलेली नोटीस खारीज केली होती. भाजपचे दोन वरिष्ठ आमदार जे. एन. मिश्रा व बी. सी. सेठी हे आपापल्या जागेवर उभे राहिले व विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे या सामग्री भिरकावल्या. यात चप्पल, कागदे, पेन, कचराकुंडी, इअरफोन आदींचा समावेश होता. तथापि, चप्पल व इतर साहित्य अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले नाही.सेठी यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे चप्पल भिरकावल्याचा इन्कार केला तर मिश्रा म्हणाले की, मी नेमके काय फेकले, हे माहीत नाही; परंतु अध्यक्ष ज्या प्रकारे वागत होते ते पाहता त्यांच्याशी असाच व्यवहार करणे योग्य होते. ते लोकशाही पद्धतीने काम करीत नव्हते. सरकारच्या मुख्य प्रतोद प्रमिला मलिक यांनी सांगितले की, मिश्रा व सेठी या भाजपच्या आमदारांनी चप्पल व ईअरफोन फेकले तर पक्षाचे प्रतोद मोहन माझी यांनी ईअरफोन फेकला. भाजपचे आमदार केवळ चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करीत असतात. या घटनेबाबत विधानसभा अध्यक्ष एस. एन. पात्रो यांनी सांगितले की, मी या घटनेची चौकशी करीत आहे. कायदा त्याचे काम करेल.ही अतिशय दुर्दैवी घटना - नरसिंह मिश्राकाँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नरसिंह मिश्रा यांनी या घटनेचा निषेध केला व अतिशय दुर्दैवी घटना आहे, असे म्हटले आहे. काँग्रेसने खाणकर्मावर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली होती; परंतु त्यांनी कोणतेही कारण न देता नोटीस फेटाळली. सभागृहात कोणत्याही चर्चेशिवाय विधेयके पारीत होत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे. सभागृहात गदारोळ होत असताना विधेयक पारित केली जाऊ नयेत. सेठी म्हणाले की, भाजप सदस्य अध्यक्ष ज्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज करीत होते, त्याचा निषेध करीत होते. त्यांनी तर विरोधी पक्षनेते पी. के. नाईक यांना सभागृहात बोलण्याची परवानगीही दिली नाही. चप्पल फेकण्याच्या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज भोजनावकाशापर्यंत स्थगित करण्यात आले.
विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे चप्पल, कचराकुंडी भिरकावली; भाजप आमदारांचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 4:28 AM