लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आज एका महिला राज्यसभा खासदाराची तब्येत बिघडली. काँग्रेसच्या खासदार फुलो देवी नेताम या घोषणाबाजी करत असताना अचानक बेशुद्ध पडल्या. तातडीने त्यांना अॅम्बुलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. नीट परीक्षेवरून विरोधक घोषणाबाजी करत असताना ही घटना घडली.
फुलो देवी घोषणाबाजी करत असताना अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्या. यावेळी त्यांच्या सहकारी खासदारांनी त्यांना आधार दिला. फुलो देवींसोबत आपच्या खासदार स्वाती मालिवाल या अॅम्बुलन्समधून जाताना दिसल्या आहेत. फुलो देवी यांना घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
फुलो देवी यांना आरएमएल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्या बेशुद्ध पडल्याचे समजताच संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी रजनी पाटील, मालिवाल, इम्रान प्रतापगढी व इतर खासदारांनी फुलो देवी यांना सावरण्यासाठी मदत केली.
राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फिलो देवी यांच्यासह १२ विरोधी पक्षाच्या खासदारांना कामकाजात व्यत्यय आणल्यावरून गैरवर्तणूक केल्याबद्दल दोषी ठरविले होते. गुरुवारी या सदस्यांना भविष्यात पुन्हा असे वर्तन न करण्याची तंबी देण्यात आली होती. याचा अहवाल विशेषाधिकार समितीने राज्यसभेत सादर केला होता.