लखनौ : आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष काढणार असून, मुलायमसिंह यादव या पक्षाचे प्रमुख असतील, अशी घोषणा समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव यांनी शुक्रवारी केली असून, त्यामुळे सपातील दरी आणखी रुंदावली आहे. अखिलेश यादव यांनी तीन महिन्यांत पक्षाची सूत्रे मुलायमसिंह यादव यांच्याकडे न दिल्यास आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष स्थापन करू, असा इशारा शिवपाल यांनी अलीकडेच दिला होता. अलीकडेच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवपाल जसवंतनगरची जागा कायम राखली आहे. सामाजिक न्यायालयासाठी समाजवादी सेक्युलर मोर्चा या नव्या पक्षाची स्थापना करण्यात येईल आणि नेताजी (मुलायमसिंह) त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असे शिवपाल यांनी इटावा येथे पत्रकारांना सांगितले. इटावा यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. शिवपाल यांच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिलेश यांनी आपल्याला प्रसिद्धीमाध्यमांद्वारे याची माहिती मिळाल्याचे सांगितले. ‘मला हे प्रसिद्धीमाध्यमाद्वारे कळाले. जर असा पक्ष स्थापन झाला असेल, तर ते देशासाठी चांगलेच आहे,’ असेही ते म्हणाले. अखिलेश सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. इटावा येथील एका नातेवाईकाच्या घरी शिवपाल यांची मुलायमसिंह यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर शिवपाल यांनी मुलायमसिंह नव्या पक्षाचे अध्यक्षपद भूषवणार असल्याचे घोषित केले. सख्खे भाऊ असलेल्या या दोन नेत्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याबाबत चर्चा केली. नव्या पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी राहील हे शिवपाल यांनी स्पष्ट केले नाही. हा पक्ष सपाविरुद्ध निवडणूक लढवेल की, सर्व समाजवाद्यांना एकत्र आणून सपाला बळकट करील, हे स्पष्ट होऊ शकले नाही. सर्व समाजवाद्यांना एका मंचावर आणण्यासाठी मुलायमसिंह यादव मोहीम सुरू करण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते. अखिलेश यांनी पक्षाची सूत्रे मुलायमसिंह यांच्याकडे देण्याचे वचन दिले होते. ते त्यांनी आता पाळावे आणि आम्ही सर्व जण सपाला बळकट करूत. मी त्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांनी तीन महिन्यांत नेताजींकडे सूत्रे न दिल्यास आपण नवा धर्मनिरपेक्ष पक्ष स्थापन करू, असे शिवपाल यांनी बुधवारी म्हटले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चुलते शिवपाल आणि पुतण्या अखिलेश यांच्यात मोठा वाद झाला होता. सपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष म्हणून अखिलेश यांच्या जागेवर शिवपाल यांची नियुक्ती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यांनी शिवपाल यांना मंत्रिमंडळातून वगळले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या धुळधाणीला अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील सत्तासंघर्ष कारणीभूत असल्याचे सपातील अनेकांना वाटते. अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली सपाचा उत्तर प्रदेशात दारुण पराभव झाला. काँग्रेससोबत युती करूनही सपाची दयनीय अवस्था झाली. सपा काँग्रेस युतीला ५४ आणि भाजपप्रणित रालोआला ३२५ जागा मिळाल्या.
सपात फूट; शिवपाल यांचा नवा पक्ष
By admin | Published: May 06, 2017 1:17 AM