नवी दिल्ली : मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशाच्या दक्षिण भागात, विशेषत: केरळमध्ये धडकलेला मान्सूनची वाटचाल आता मंदावली असून, तो संथपणे पुढे सरकत आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात मान्सून पोहोचण्यास उशीर होऊ शकतो, असे चित्र सध्या आहे.देशात मान्सूनचे आगमन मोठ्या दिमाखात झाले. मात्र, आठवड्यातच या परिस्थितीत बदल झाला. गेल्या १० दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झाला नाही, असे कृषी हवामानशास्त्रज्ञ केली टेपली यांनी सांगितले. उत्तर-पश्चिम भागात अद्याप मान्सून सक्रीय झाला नाही. आणखी काही आठवडे हीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे. आणखी किमान एक आठवडा तरी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात काही भागांत दोन ते तीन दिवसांत तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअसने वाढू शकेल. तेथील तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात मान्सून अडकून पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गोव्यानंतर लगेचच कोकणपट्टीत व मुंबईत पावसाचे आगमन होते.>शेतीवर बाजारपेठा अवलंबूनभारतातील २.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. कृषि क्षेत्रातील उत्पादनावरच बाजारपेठा अवलंबून आहेत. म्हणजे, चांगले कृषि उत्पादन झाले तर, ट्रॅक्टरपासून ते सोने आणि रेफ्रिजरेटरसारख्या वस्तुंवरील खर्च वाढतो. हवामान विभागाने मान्सून ९७ टक्के एवढा राहील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र त्या दृष्टीने देशभर पावसाची वाटचाल झाल्याचे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत मुंबईतही हवातसा पाऊ स पडलेला नाही. पश्चिम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही काही अपवाद वगळता पाऊस कमी झाला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांच्या काही भागांत मात्र पावसाने दणका दिला आहे. असे क्वचितच घडते. तथापि, आगामी दोन दिवस दिल्लीसह उत्तर आणि उत्तर पश्चिम राज्यात धुळीसह वारे वाहू शकतात. या वाऱ्याचा वेग ३५ किमी प्रति तास एवढा असू शकतो. तसे झाल्यास दिल्ली व आसपासच्या राज्यांमध्ये धुळीचे वादळ व त्यामुळे झालेले प्रदुषण यांना आळा बसेल. तिथे लोक पावसाची वाट पाहत आहे.
मान्सूनची वाटचाल संथ, अनेक भागांत पोहोचण्यास विलंब, शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:52 AM