नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी गुढ झाला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या महाशिवआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत शिवसेना आणि सत्तास्थापना या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं पवारांनी सांगितले. मात्र, सरकार स्थापनेबाबत खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी आहेत. हळू हळू सगळं उलगडेल, लवकरच महाराष्ट्रात सरकार बनले, असे राऊत यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार असून ते स्थिर राहिल, असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. राऊत यांनी दिल्लीत सकाळीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना, शरद पवार काहीच चुकीचं बोलत नसल्याचे राऊत यांनी म्हटले. शिवसेना मोठा पक्ष आहे, म्हणून सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला जाऊन विचारा, हे म्हणणे चुकीचं नसल्याचं राऊत यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही गंभीर असून राज्यातील सर्वच खासदारांनी याप्रश्नी एकत्र यावे. मोदींनी पवारांचं कौतुक केलं म्हणून काय झालं. पवार माझे गुरु असल्याचं मोदींना जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे, त्याचा राजकीय अन्वयार्थ निघत नाही. शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून मीडियाच्याच मनात गोंधळ असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला.
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याच्या विषयावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देताना काही अटी निश्चित ठेवायला हव्यात, असे सोनिया यांनी पवार यांना सांगितले. त्यामुळे सरकारच्या स्वरूपाबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत पुन्हा भेटणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे.आपल्याला सरकारमध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी शिवसेनेवर राष्ट्रवादी दबाव आणत आहे. राष्ट्रवादीपेक्षा 10 आमदार कमी असलेल्या काँग्रेसलाही अधिक प्रतिनिधित्व हवे असल्याने, त्यावर दोन्ही पक्षांत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, दोन दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चर्चा होईल. त्यानंतर, सोनिया गांधी निर्णय घेतील.