गुजरातच्या अहमदाबाद येथील एका आयटी कंपनीच्या मालकाने आपल्या 13 कर्मचाऱ्यांना आलिशान कार भेट दिल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या आयटी कंपनीची उलाढाल कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगण्यात आले. देश-विदेशातील अनेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू आहे, अशा परिस्थितीत गिफ्ट म्हणून चमकणारी कार मिळाल्याने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
कंपनीच्या स्थापनेपासून जे कर्मचारी कंपनीशी संबंधित आहेत त्यांना कंपनीने ही कार भेट दिली आहे. तर दुसरीकडे कार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, आज आमच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. अहमदाबादच्या त्रिध्या टेक लिमिटेड कंपनीच्या 13 कर्मचाऱ्यांना लक्झरी कार भेट देण्यात आल्या आहेत. कंपनीचे एमडी रमेश मारंड सांगतात की, आमची कंपनी एक स्टार्टअप होती.
ज्या कर्मचाऱ्यांना कार भेट देऊन गौरविण्यात आले ते सर्वजण सुरुवातीच्या दिवसांपासून कंपनीशी संबंधित होते. हे लोक आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्टार्टअपवर विश्वास ठेवून कंपनीत रुजू झाले होते. ही कंपनी वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. कंपनीचे एमडी रमेश मारंड यांनीही सांगितले की, आता आम्ही कंपनीच्या उर्वरित कर्मचाऱ्यांना ही कार गिफ्ट करण्याचा विचार करत आहोत.
कष्टाचं फळ मिळालं
कंपनीकडून आलिशान कार गिफ्ट म्हणून मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही सुरुवातीपासून येथे काम करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आज आमची कंपनी जागतिक स्तरावर काम करत आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे. आम्हाला कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.
कंपनीची परदेशात ब्रांच
एमडी रमेश मारंड यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीचे काम आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरलेले आहे. आमची कंपनी BFSI, हेल्थकेअर, विमा, रिटेल आणि एनर्जी यांसारख्या उद्योगांसाठी सॉफ्टवेअर विकसित करते. तसेच अनेक कंपन्यांना टेक सपोर्ट प्रदान करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.