हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असल्याचा दावा आघाडीतील नेते करीत असले तरी हा विषय ताणलेलाच असल्याचे दिसत आहे. 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांना अधिक जागा देण्याबाबत आघाडीतील प्रमुख पक्ष असलेली काँग्रेस सकारात्मक नसल्याने हा विषय लांबल्याचे चित्र आहे. या आघाडीत काँग्रेसशिवाय उद्धवसेना तसेच शरद पवार गट हे दोन प्रमुख पक्ष असले तरी मविआच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे समाजवादी पक्ष, भाकप, माकप, पीडब्लूपी व इतर छोटे पक्षही आहेत. सपाने मविआकडे १२ जागांची मागणी केली आहे. तर, माकपनेही ८ ते ९ जागा मागितल्या आहेत. भाकपनेही ३ ते ४ जागा मागितल्या आहेत.
माकप व शेतकरी कामगार पक्षाचा राज्य विधानसभेत सध्या प्रत्येकी एक आमदार आहे. डाव्या पक्षांना अधिक जागा दिल्या तर मविआ अधिक भक्कम होईल, असा दावा केला जात आहे. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव मुंबईत असून मविआतील घटक पक्षांशी चर्चेतून सकारात्मक तोडगा काढण्याच्या दिशेने चर्चा झाली आहे. २८८ पैकी २६० जागावाटपावर अंतिम निर्णय झाला असल्याचे मानले जात आहे. अखिलेश यादव यांची शुक्रवारी मालेगावमधील सभा तसेच धुळ्यात शनिवारी होत असलेल्या जाहीर सभा सपाच्या तयारीचेच द्योतक मानले जाते. राज्यातील काही ठराविक मतदारसंघांसाठी सपाने अगोदरच आपले उमेदवार निश्चित केले आहेत.
लोकसभेत होता फक्त ०.४% मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीत मतांचा फरक फक्त ०.४% होता. आघाडीला ४४% तर महायुतीला ४३.६% मते पडली होती. लोकसभेत भाजपला पराभूत करण्यासाठी माकपने जागेचा आग्रह धरला नव्हता. आता त्याची महाविकास आघाडीकडून परतफेड करण्याची वेळ असल्याचे माकपने म्हटले आहे.