नवी दिल्ली : पाकिस्तानामधून दहशतवाद्यांची होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सीमेवर वीजप्रवाह असलेली भिंत उभी करण्यात आली आहे. ही भिंत उघड्या डोळ्यांना दिसत नाही. हे तंत्रज्ञान अद्ययावत असून हवा, पाणी आणि जमिनीतही वीजेचा प्रवाह असलेला थर उभारता येणार आहे. यामुळे घुसखोरी होत असल्याचे समजणार आहे.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी या वीजप्रवाह असलेल्या भिंतीच्या दोन प्रकल्पांचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करणार आहेत. एका प्रकल्पाद्वारे 5.5 किमीच्या सीमेचे रक्षण करता येणार आहे. या प्रणालीला कॉम्प्रिहेन्शिव इंटिग्रेटेड बॉर्डर मैनेजमेंट सिस्टम (CIBMS) असे नाव देण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेतला जातो. यावेळी घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठविण्यात येते. यासाठी उंचसखल भाग जास्त निवडला जातो. या भागात CIBMS ही यंत्रणा वापरली जाणार आहे. यामध्ये थर्मल इमेजर, इन्फ्रा-रेड आणि लेझरवर आधारित अलार्म असणार आहे. या प्रणालीमध्ये जमिन, हवा आणि पाण्यामध्ये सेन्सर लावण्यात आले आहेत. हे सेन्सर घुसखोरांच्या हालचाली टीपून त्या जवानांना कळविणार आहेत.
सीमारेषेवर तारांचे कुंपण उभारण्यात आल्याने घुसखोरांनी जमिनीमध्ये सुरुंग खोदून भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास प्राधान्य दिले आहे. आता या अदृष्य भिंतीमुळे सुरुंग खोदण्यास जरी सुरुवात केली तरीही त्याची कंपने नोंदविली जाऊन त्याचे ठिकाण भारतीय जवानांना कळणार आहे.