सतना: कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर शाळा-कॉलेजने-कोचिंग क्लासेसने ऑनलाइन क्लासेस सुरू केले. विद्यार्थी घरात बसून मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर ऑनलाइन अभ्यास करू लागले. आजही बऱ्याच ठिकामी ऑनलाइन क्लास सुरू आहेत. पण, याच ऑनलाइन क्लासदरम्यान एका मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील सतना येथे ऑनलाइन क्लास सुरू असताना मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत आठवीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटामुळे मुलाच्या एका हाताला आणि चेहरा गंभीररित्या भाजले. यानंतर कुटुंबियांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.
तोंड आणि नाकावर गंभीर इजा
रामप्रकाश भदौरिया(वय 15)असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. हा सतना येथील चांदकुईया गावातील एका खासगी शाळेत आठवीच्या वर्गात शिकतो. फोनवर ऑनलाइन क्लास सुरू होता, तेवढ्यात मोबाईलचा मोठा स्फोट झाला. यामुळे विद्यार्थ्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झाला. त्याच्या हातालाही दुखापत झाली आहे.
स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंबीय आले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्याला नागौड येथील आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सतना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातूनही विद्यार्थ्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लगेच जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मोबाईलच्या स्फोटात विद्यार्थ्याच्या तोंडाला आणि नाकाला पूर्णपणे मार लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.