- ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - पत्नीने स्मार्टफोन लॉक खोलण्यासाठी पासवर्ड न सांगितल्याने नाराज झालेल्या आरोपी पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाशीमधील निवासस्थानी पत्नीची हत्या करण्यात आली. उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
पूनम वर्मा असं पिडित महिलेचं नाव आहे. 29 ऑगस्ट रोजी पती विनीत कुमारच्या मित्राने पूनमची गळा दाबून हत्या केली. दुस-या दिवशी पूनमच्या 4 वर्षाच्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजा-यांना हत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विनीतची चौकशी केली. विनीतने आपण कामानिमित्त कानपूरला गेलो होतो अशी माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी विनीतच्या फोन कॉल्सची तपासणी केली. त्यानंतर पुन्हा चौकशी केली असता विनीतने आपला गुन्हा कबूल केला. 'मी माझ्या पत्नीसोबत झांशी येथे राहत होतो. कामानिमित्त मला नेहमी कानपूरला जायला लागायचं. गेल्याच महिन्यात पूनमने स्मार्टफोन खरेदी केला, त्यानंतर तिच्या वागण्यात खूपच बदल झाला. ती मला आणि आमच्या मुलीकडे दुर्लक्ष करायला लागली. तिने आपला मोबाईल फोनदेखील लॉक केला होता जेणेकरुन कोणी तो पाहू नये,' अशी माहिती विनितने पोलिसांनी दिली.
विनीतला पूनम आपल्याला धोका देत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी विनीतने आपल्या मित्रांना 80 हजार रुपये दिले. 29 ऑगस्टला विनीतने कानपूरहून पुनमला फोन करुन आपले दोन मित्र काही कामासाठी घरी येत असल्याचं कारण सांगितलं. विनीतचे मित्र लक्ष्मण आणि कमर कॉम्प्यूटर घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरी आले आणि त्यांनी गळा दाबून पूनमची हत्या केली. चोरी करण्याच्या उद्धेशाने हत्या झाल्याचा बनाव करण्यासाठी घरातील दागिनेही चोरुन नेले.