नवी दिल्ली : आयुष्यातील यशापयश हे फक्त परिक्षेवरच अवलंबून नसते, विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहावे. केवळ मार्कांच्या मागे न लागता अधिकाधिक ज्ञान मिळवा, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्माइल मोअर, स्कोअर मोअर’चा मंत्र दिला. निमित्त होते आकाशवाणीवरील ‘मन की बात’कार्यक्रमाचे. परीक्षेला सामोरे जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना मोदी म्हणाले की, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घरात उत्सवासारखे वातावरण ठेवावे. हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडावी. जेवढ्या आनंदाने आपण या परिक्षेला सामोरे जाल तेवढे अधिक गुण आपण मिळवू शकाल. परिक्षा आनंदाचा उत्सव असायला हवा. कारण वर्षभर आपण खूप मेहनत केली आहे. आता ती मेहनत सार्थकी लावण्याची वेळ आहे. बहुतांश जण परीक्षेत दडपणाखाली राहतात, पण या काळात कसे राहायचे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आनंदी राहाल तर खूप काही मिळवाल आणि दडपणात राहाल तर पश्चात्ताप होईल. कुंभमेळ्याचे उदाहरण देऊन मोदी म्हणाले की, ४० ते ४५ दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यातील व्यवस्था पाहा. थोड्या दिवसांसाठीच ही व्यवस्था आहे, पण त्यात किती शिस्त आहे.ही उत्सवाची ताकद आहे जी तुम्हाला दडपणातून मुक्त करते. हे मी अनुभवातून सांगतो की, जर तुम्ही तणावात राहाल, तर बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात.पण तणावमुक्त राहाल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. सोमवारी ३० रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शहिदांसाठी दोन मिनिटे श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहनही मोदी यांनी केले. आगामी अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी या ‘मन की बात’मध्ये कोणताही उल्लेख केला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्माइल मोअर, स्कोअर मोअर
By admin | Published: January 30, 2017 12:48 AM