नवी दिल्ली: २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगात पहिला देश ठरला आहे. आतापर्यंत ३ देश चंद्रावर पोहचले आहेत. मात्र दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरून विविध माहिती गोळा करत आहे.
भारताचं चंद्रयान ३ मोहिम फत्ते झाल्यानंतर चांद्रयान-३ मिशनच्या रोव्हर प्रज्ञानने लँडर विक्रमचा फोटो घेतला आहे. हा फोटो शेअर करताना इस्रोने लिहिले 'स्माइल प्लीज!' रोव्हरवर बसवण्यात आलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हे छायाचित्र काढल्याचे इस्रोने सांगितले. इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सच्या प्रयोगशाळेने हा विशेष कॅमेरा विकसित केला आहे. इस्रोने सांगितले की, रोव्हर प्रज्ञानने ३० ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३५ वाजता हा फोटो घेतला.
चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे. इस्रोकडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. रोव्हरने चंद्रावर काही विशेष घटक शोधले आहेत. आता ते चंद्राच्या पृष्ठभागावर अधिक ठिकाणी जाईल आणि घटकांची रचना आणि एकाग्रतेबद्दल माहिती मिळवणार आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध रोव्हरकडून सुरू असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.
आदित्य-एल1 प्रक्षेपणासाठी सज्ज
चांद्रयान-३ च्या यशाने खूश झालेल्या देशवासीयांना इस्रो लवकरच आणखी एक आनंद देण्याची तयारी करत आहे. खरं तर, ISRO आपली पहिली सूर्य मोहीम आदित्य-L1 २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करणार आहे. आदित्य-L1 ने सुसज्ज भारताचे प्रक्षेपण वाहन PSLV लाँचिंग पॅडवर पोहोचले आहे. इस्रोने त्याचे फोटोही शेअर केले आहेत. अंतराळवीर डॉ. आर.सी. कपूर यांनी आदित्य L1 मोहिमेला अवकाशात नेणाऱ्या PSLV या प्रक्षेपण वाहनाचे कौतुक करताना सांगितले की PSLV हे इस्रोचे विश्वसनीय यंत्र आहे. ISRO च्या बहुतेक प्रक्षेपणांमध्ये PSLV चा वापर केला जातो. PSLV कमी पृथ्वीच्या कक्षेत ३२०० किलो पेलोड घेऊ शकते आणि पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत सुमारे १४०० किलो पेलोड घेऊ शकते.