नवी दिल्ली - भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २१२ प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले होते. हे विमान आज सकाळी ६ वाजता भारतात पोहोचले. मायभूमीत उतरताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं विमानतळावर पाहायला मिळालं. सरकारने या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.
हमास आणि इस्रायलमधील संघर्षात हजारो नागरिक अडकले आहेत. तब्बल १८,००० भारतीय इस्रायलमध्ये राहतात. यात परिचारिका, विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी यांचा समावेश आहे. घमासान युद्ध सुरू असलेल्या इस्रायलमधून अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान भारतात उतरले. ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत भारत सरकार ही मोहीम राबवत आहे.
इस्रायलमधील तेल अवीव येथे भारतीय नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मायभूमीत परतण्यासाठी हजारो भारतीयांची धावाधाव सुरू आहे. त्यातच, २१२ प्रवाशांसह पहिलं विमान दिल्लीत पोहोचलं आहे. यावेळी, प्रवाशांनी विमानतळावर उतरताच इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी सांगितल्या. तसेच मायभूमीत उतरल्याचा आनंदही व्यक्त केला. आपल्या लहान मुलांसोबत अनेकजण भारतात परतले. त्यावेळी, भारत सरकारचे सर्वांनी आभारही मानले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ट्विट करुन विमानातून उतरलेल्या भारतीयांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रवाशांसोब संवाद साधला.
मायभूमीत उतरताच अनेकांचे डोळे पाणावले होते. मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो, आपल्या लोकांमध्ये आलो, आपल्या जमिनीवर उतरलो, अशी भावना भारतीयांमध्ये दिसून आली.
भारतीयांसाठी कंपन्यांसोबत बैठका
तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.