नवी दिल्ली:दिल्लीमध्ये प्रदूषण ही एक प्रमुख समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललय. दिल्लीतील हवा शुद्ध करण्यासाठी दिल्लीमध्ये एका स्मॉग टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज या स्मॉग टॉवरचं उद्घाटन केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील पहिला स्मॉग टॉवर दिल्लीत बसवण्यात आला आहे. या टॉवरमध्ये अमेरिकेतून आयात केलेल्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा टॉवर सुमारे 24 मीटर उंच असून, टॉवरची क्षमता 1000 क्यूबिक मीटर प्रती सेकंदाची आहे. हा अतिशय वेगानं आपल्या आसपासची हवा स्वच्छ करू शकतो. याची रेंज 1 किलो मीटरपर्यंतची आहे. म्हणजेच, या टॉवरच्या एक किलोमीटर परिसरातील हवा हा टॉवर स्वच्छ करेल. दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात हा टॉवर लावण्यात आला आहे.
कसा काम करतो हा टॉवर ?स्मॉग टॉवरला मोठ्या आकाराचे हवा शुद्ध करणारे यंत्र म्हणता येईल. यात पंखे असतात, जे आतून प्रदूषित हवा ओढून घेतात आणि टॉवरच्या आत बसवलेले फिल्टर आणि इतर उपकरणे कार्बन आणि धूळ हवेतून वेगळं करुन हवा शुद्ध करतात.