लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ ताशी १४५ कि.मी. वेगाने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राच्या किनाऱ्यांवर धडकले आहे. मागील दशकभरात अशाच अनेक चक्रीवादळांनी भारताच्या विस्तीर्ण ७५१६ किमी लांबीच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. जगातील सुमारे आठ टक्के उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा भारताला धोका आहे. गेल्या १० वर्षांत भारताच्या विविध भागांमध्ये अनेक प्राणघातक चक्रीवादळांचा परिणाम झाला आहे.
चक्रीवादळ 'बिपाेरजॉय' गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखो बंदरावर धडकले असून, यात प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्छमध्ये विजेचा टॉवर कोसळला असून, अनेक ठिकाणी मंदिरांचेही नुकसान झाले.
‘एचएएम’ रेडिओ टीम तैनात
‘बिपोरजॉय’ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने ‘एचएमए’ रेडिओची टीम तैनात केली.
टौटे
- १७ मे २०२१ रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘टौटे’ दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
- १००+मृत्यू
हुदहुद
- १२ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले.
- १२४मृत्यू
अम्फान
- ओडिशामधील १९९९ च्या सुपर चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात धडकणारे पहिले सुपर चक्रीवादळ अम्फान २० मे २०२० रोजी पश्चिम बंगालमधील सुंदरबनजवळ धडकले. भारत, बांगलादेशमध्ये सुमारे १४ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले.
- १२९ मृत्यू
फायलिन
- १२ ऑक्टोबर २०१३ ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोपालपूर जवळील किनारपट्टीला फायलिन धडकले. २०० किमी प्रतितास वेगाने वारे. राज्यातील १.३२ कोटी लोकांना फटका.
- ४४मृत्यू
फानी
- ३ मे २०१९ रोजी हे वादळ ओडिशातील पुरीजवळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला १७५ किमी प्रतितास वेगाने धडकले.
- ६४मृत्यू
वरदा
- १२ डिसेंबर २०१६ रोजी चेन्नईजवळ धडकले. त्यात तमिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.
- १८ मृत्यू
‘भोला’ने केले पाकचे दोन तुकडे
- १२ नोव्हेंबर १९७० रोजी पूर्व पाकच्या किनारपट्टीवर ‘भोला’ चक्रीवादळ आले. त्यातील विध्वंसामुळे गृहयुद्ध झाले. त्यातून बांगलादेशचा जन्म झाला.
- या चक्रीवादळामुळे ३००००० ते ५००००० लोकांचा मृत्यू झाला.