नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांच्या वादग्रस्त विधानांवर लोकसभा आणि राज्यसभेत हक्कभंग व लक्षवेधी सूचना दाखल करीत कथेरियांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस व अन्य विरोधकांनी केली. तथापि हक्कभंग प्रस्तावारील चर्चा हाणून पाडण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या सहयोगी अण्णा द्रमुकने माजी मंत्री चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या कथित भ्रष्टाचाराचे आरोप करणारी पत्रके फडकवीत घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित होत अखेर दुपारी दिवसभराकरीता तहकूब झाले. तथापि हा मुद्दा आपण सोडणार नाही, सरकारला संसदेत त्याचे उत्तर द्यावेच लागेल, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ठणकावले.रोहित वेमुला व जेएनयु प्रकरणाचा खुलासा करताना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्मृती इराणींनी खोटी माहिती देत सभागृहांची दिशाभूल केली, तसेच खासदार पती राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या पत्राचा उल्लेख करीत सुपौलच्या काँग्रेस खासदार रंजिता रंजन यांना इराणींनी लोकसभेत अपमानित केले. त्यामुळे विशेषाधिकाराचा भंग केल्याचा आरोप करीत, काँग्रेसने इराणींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. स्मृती इराणी व कथेरिया दोघांच्या वादग्रस्त विधानांवरील हक्कभंग प्रस्तावांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी विरोधकांची प्रमुख मागणी होती. मात्र अण्णा द्रमुकच्या सदस्यांना गोंधळ घालायला लावून, सत्ताधाऱ्यांनी कामकाज हाणून पाडले, असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगेंनी केला.राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या अण्णाद्रमुक सदस्यांना उपसभापती कुरियन यांनी वारंवार बजावले की मुळात कार्ती चिदंबरम हे या सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांच्यावर काही आरोप करायचे असतील तर ते सदस्यांनी सरकारकडे करावेत. सभागृहात गोंधळ घालून काहीही निष्पन्न होणार नाही. राज्यसभेचे सभापती अथवा उपसभापती म्हणजे सरकार अथवा न्यायालय नव्हे, या प्रकरणात आम्ही काहीच करू शकत नाही. तरीही कुरियन यांचे निर्देश अथवा विनवण्या ऐकण्याच्या मन:स्थितीत गोंधळी खासदार नव्हते. त्यांनी उभय सभागृहांचे कामकाज दिवसभराकरीता बंद पाडले. (विशेष प्रतिनिधी)संसदेबाहेर कथेरियांवर थेट आरोप करीत काँग्रेसचे गटनेते खरगे म्हणाले, दोन समुदायांमधे धार्मिक विद्वेष निर्माण करून समाजस्वाथ्य बिघडवण्याचा रा.स्व.संघ व भाजपचा डाव आहे. निवडणुका येताच हे मुद्दाम कुरापती काढतात. जद (यु)चे अली अनवर म्हणाले, राज्यमंत्र्यांचे वक्तव्य धोकादायक आणि देशाची एकात्मता तोडणारे आहे. कथेरियांना मंत्रिमंडळातून थेट बरखास्त करण्याची मागणी मायावतींनी केली. काँग्रेस नेते पी.एल पुनिया म्हणाले, कथेरियांचे भाषण सांप्रदायिक विष उगाळणारे आहे. एमआयएमच्या असाउद्दिन ओवेसींनीही कथेरियांच्या भाषणाचा संदर्भ देत सबका साथ सबका विकास घोषणा देणाऱ्या सरकारचा निषेध केला.1 आग्य्रात विहिंपचे कार्यकर्ते अरूणकुमार यांच्या शोकसभेत कथेरियांनी वादग्रस्त भाषण ठोकले. ‘हिंदु समुदायाने आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे, अशी गर्जना करीत, स्थानिक प्रशासनाला कथेरियांनी बजावले की मंत्रिपद स्वीकारल्याने माझे हात बांधलेले आहेत असे समजू नका, मीदेखील कधीकाळी हातात लाठ्या घेउनच फिरत असे’. 2 कथेरियांच्या भाषणाची चित्रफित वाहिन्यांवरून दाखवली गेल्यावर आपण असे बोललोच नाही, केवळ स्वसंरक्षणासाठी हिंदुंनी संघटीत व्हावे, इतकेच म्हणालो, असा खुलासा कथेरियांनी केला. 3 त्यांना भाजपने क्लीन चीट दिल्याची बातमी समजताच, दोन्ही सभागृहांत त्याचे पडसाद उमटले. काँग्रेस, डावे पक्ष, सीपीआय (एमएल) आदी पक्षांनी कथेरियांच्या विरोधात हक्कभंग व आग्य्राच्या घटनेवर लक्षवेधी सूचना दाखल केल्या. त्यावर चर्चा होऊ नये, यासाठी सत्ताधारी आघाडीने अण्णा द्रमुकला गोंधळ घालण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझादांनी केला.
स्मृती इराणी व कथेरिया यांच्या विधानांचे संसदेत गंभीर पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 2:38 AM