Smriti Irani : “बिनशर्त लिखित माफी मागा,” स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:23 AM2022-07-25T09:23:14+5:302022-07-25T09:24:34+5:30
Smriti Irani : स्मृती इराणी यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. तसंच त्यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा अवैध बार असल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने आणखी एक आरोप केला होता. त्या बारपासून दहा किमी अंतरावर गोव्यात स्मृती इराणींच्या नावे अलिशान घर असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. कोर्जुए गावात हे घर असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. स्मृती इराणी यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस पाठवल्या आहेत.
स्मृती इराणी यांनी पवन खेडा, जयराम रमेश, नेत्ता डिसूजा आणि काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच बिनशर्त लिखित माफी मागावी आणि तात्काळ प्रभावानं आरोप मागे घेण्यास त्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.
Union Minister Smriti Irani sends legal notice to Congress leaders Pawan Khera, Jairam Ramesh, Netta D' Souza & Congress over remarks on her 18-year-old daughter & ask them to tender a written unconditional apology and withdraw the allegations with immediate effect
— ANI (@ANI) July 24, 2022
(file pic) pic.twitter.com/meHGyQKvBW
काय म्हटलं होतं काँग्रेसनं?
काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लायसन्स घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला होता. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावर स्मृती इराणी यांनी प्रत्यूत्तर देताना सोनिया आणि राहुल गांधींच्या ५ हजार कोटींच्या लूटप्रकरणी तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली, ही माझ्या मुलीची चूक आहे. मी राहुल गांधींना २०२४ मध्ये पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देते, मी वचन देते की ते पुन्हा पराभूत होतील. माझी १८ वर्षांची मुलगी प्रथम वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि कोणताही बार चालवत नाही, असे म्हणाल्या.