अमेठीच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते अजय राय चांगलेच अडचणीत आले आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाही टार्गेट होताना दिसत आहे. अजय राय सोमवारी अमेठीचा उल्लेख करत म्हणाले, ही जागा गांधी कुटुंबाची आहे आणि राहुल गांधी यांनी तेथून पुन्हा निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी, स्मृती इराणी या बाहेरच्या आहेत. त्या अमेठीत काहीही काम करत नाहीत आणि केवळ 'लटके-झटके' देत निघून जातात. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून स्मृती इराणी यांनी थेट गांधी कुटुंबावर आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे.
स्मृती इराणी यांनी सर्वप्रथन ट्विट करत राहुल गांधी यांना आव्हान दिले. आपल्या प्रांतिक नेत्याने अमेठीतून निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्यकेले आहे. आता आपण यावर कायम राहणार, की घाबरून माघार घेणार? याशिवाय याच ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधींवर निशाणाही साधला आहे. 'आपल्याला आणि आपल्या मम्मी जींना आपल्या महिला विरोधी नेत्यांसाठी एक नव्या स्पीच राइटरची आवश्यकता आहे,' असेही त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
एवढेच नाही तर, 'गांधी कुटुंबाला अशी भाषा आवडते का? अभद्र भाषा काँग्रेसच्या संस्कारांचे प्रदर्शन करते. माझ्या विरोधात गांधी कुटुंबातील लोकांसमोरही अभद्र वक्तव्ये केली गेली आहेत. गांधी कुटुंब अशा लोकांना प्रोत्साहन देते आणि अभद्र वक्तव्यांसाठी त्यांना पदकही देते. एवढेच नाही तर, अशा प्रकारची वक्तव्ये केल्यानंतर हायकमांड त्यांना बढती देईल, असेही काँग्रेस नेत्यांना वाटते,' असेही इराणी यांनी म्हटले आहे.
एकीकडे भाजप अजय राय यांच्या वक्तव्याचा राजकीय वापर करताना दिसत आहे. तर दुसरीकडे कायदेशीर कारवाईचीही तयारी सुरू आहे. भाजपच्या एका महिला नेत्याने रॉबर्टसगंजमध्ये अजय राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अजय राय यांची चौकशी होऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाने अजय राय यांना नोटीस जारी करत २८ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.