सत्येंद्र जैन यांच्यानंतर केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांना बनावट आरोपांनुसार अटक केली जाणार आहे असं आपल्याला विश्वासार्ह सूत्रांकडून संगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली."खोट्या रडक्या कथा पसरवण्याऐवजी, स्वतःला निर्दोष सिद्ध करणे सोपे होईल कारण आता लोक ते ऐकणार नाहीत. एकाही प्रश्नाचं उत्तर न देता केजरीवाल यांनी एक प्रकारे त्यांच्या मंत्र्याची हवाला संबंध मान्य केले आहेत,” असं ट्वीट स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं.
स्मृती इराणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. सत्येंद्र जैन यांनी २०१०-११ ते २०१५-१६ या कालावधीत हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने कोलकातामधील ५६ बनावट कंपन्यांचा वापर करून १६.३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला नव्हता का? हे केजरीवाल नाकारू शकतात का असा सवाल इराणी यांनी केला होता. "आयकर आयुक्तांनी हे मानलं की १६.३९ कोटींचं बेहिशोबी उत्पन्न अंकुश जैन आणि वैभव जैन यांचं नसून सत्येंद्र जैन याचे खरे मालक होते हे खरं आहे का?,“ असा सवालही त्यांनी केला होता.
“मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं केंद्र सरकार बनावट प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. माझ्या विश्वसनीय सूत्रांनी मला लवकरच सिसोदिया यांना अटक केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानं त्यांच्याविरोधात बनावट प्रकरणं तयार करण्याचे आदेश दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.