नवी दिल्ली - सैन्यात महिला अधिकाऱ्यांकडे नेतृत्व सोपविण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना त्यांना 'बेगानी शादी का अब्दुला' संबोधले.
सैन्यात महिला अधिकाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांच्या महिला विरोधी विचारांना आणि महिलांविषयीच्या त्यांच्या पूर्वगृहाना सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपी दाखवल्याचे राहुल यांनी म्हटले होते. तसेच या मुद्दाच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारने न्यायालयात मांडलेले म्हणणे महिलांचा अपमान असल्याचे संबोधले होते.
यावर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला. त्यांनी ट्विटरवरून राहुल गांधी यांनी 'बेगानी शादी का अब्दुला' असे म्हटले. ट्विटवर त्या म्हणाल्या की, आदरणीय 'बेगानी शादी का अब्दुला दिवाने, ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते ज्यांनी सशस्त्र सैन्यात महिलांसाठी स्थायी आयोगाची घोषणा केली होती. त्यामुळे लैगिक न्याय निश्चित झाला. तुमच्या सरकारच्या काळात भाजपच्या महिला मोर्चाने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे ट्विट करताना तुमच्या टीमशी बोलून घेत चला, असा सल्लाही इराणी यांनी राहुल यांना दिला.