Smriti Irani Gas Cylinder Price : गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल असेल किंवा स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. महागाईविरोधात काँग्रेसनं केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. याचदरम्यान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा (Netta Dsouza) यांनी महागाईबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Minister Smriti Irani) यांच्या विमानातच प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.
ही घटना दिल्ली-गुवाहाटी विमानाच्या प्रवासादरम्यान घडली. जेव्हा विमानात नेटा डिसुझा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आमने-सामने आल्या तेव्हा त्यांनी स्मृती इराणींना स्वयंपाकाच्या गॅसबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी जवळपास १ मिनिट ११ सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्मृती इराणी नेटा डिसुझा यांच्या प्रश्नाचं कोणतंही थेट उत्तर देताना दिसत नाहीयेत. यादरम्यान, स्मृती इराणी यांनी लोकांना पहिले विमानातून उतरू द्या त्यांना समस्या होत आहे असं सांगितलं. यावर उत्तर देताना डिसुझा यांनी हा लोकांचाच प्रश्न असल्याचं म्हटलं.
विमानात शाब्दिक चकमकप्रवासादरम्यान एका महिला प्रवाशानं स्मृती इराणी यांना 'हॅप्पी बिहू' असं विश केलं. यावर त्यांनीही उत्तर दिलं. यावर डिसुझा यांनी "हॅप्पी बिहू, विना स्टो, विना गॅस" असं म्हटलं. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हटलं.