"राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:32 PM2023-08-09T13:32:54+5:302023-08-09T13:33:21+5:30
"भारतमातेची हत्या करण्याच्या वाक्यावर टाळ्या वाजवण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला"
Smriti Irani vs Rahul Gandhi, Monsoon Session of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. राहुल गांधींच्या भाषणाला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मणिपूरच्या हिंसाचारावर मौन बाळगले. यातून असे दिसून येते की, मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली," असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केला. यावर स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील हिंसेच्या घटना व अत्याचाराच्या घटनांविषयी मांडणी केली. तसेच, राहुल गांधींना संसदेतूनच थेट आव्हान दिले.
राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर...
"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. त्यातही अशा विधानांवर काँग्रेस पक्ष इथे बाकं वाजवत होता, टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेच्या हत्येच्या गोष्टींवर टाळ्या वाजवून यांनी साऱ्या देशाला सूचित केले की नक्की कोणाच्या मनात विश्वासघाताची भावना आहे. मणिपूरचे तुकडे अजिबात झालेले नाहीत, तो विभागलेला नाही. तो अजूनही देशाचाच भाग आहे. पण तुमच्या मित्र पक्षाचे नेते तामिळनाडूत म्हणाले की, भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्या द्रमुकच्या सहकाऱ्याचे खंडन करून दाखवा. काश्मीर भारतापासून वेगळे करण्याची चर्चा करण्याची भाषा करणाऱ्या काश्मीरमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध करून दाखवा," अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिले.
#WATCH | Union Minister and BJP MP Smriti Irani says, "Bharat maa ki hatya ki baat karne wale kabhi bhi mez nahi thapthapate. Congressiyo ne baith kar maa ki hatya ke liye mez thapthapaai hai..." https://t.co/Nay92GDe4kpic.twitter.com/uAPE2YQIRN
— ANI (@ANI) August 9, 2023
काँग्रेसच्या कार्यकाळातील घटनांचा वाचला पाढा...
स्मृती इराणी यांनी काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अत्याचाराचाही उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी काही अत्याचार पिडित महिलांचा व त्यांच्याबाबतच्या घटनांचाही यावेळी उल्लेख केला. "तुम्ही आम्ही काश्मिरी पंडितांबद्दल बोलू इच्छित नाही. त्यांनी अश्रू ढाळले, दौरे केले. पण 1984 च्या दंगलीत पत्रकार प्रणय गुप्ता यांनी लिहिलं होतं की, मुलांना मारून त्यांचे मृतदेह आईच्या पुढ्यात टाकण्यात आले होते. नुकतेच राजस्थानच्या भिलवाडा येथे १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर ते कापण्यात आले. मग भट्टीत ठेवण्यात आले. दोन महिला खासदार तिथे गेल्या होत्या. तेथे मुलीचा एक हात भट्टीच्या बाहेर पडला होता. बंगालमध्ये एका ६० वर्षीय महिलेवर तिच्या नातवासमोर बलात्कार झाला, तेव्हा या काँग्रेसच्या लोकांनी न्यायासाठी याचना केली नाही. यावर एक शब्दही बोलण्यात आला नाही," अशा शब्दांत भाजपविरोधी राज्यांतील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.