स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:52 AM2022-07-29T08:52:45+5:302022-07-29T08:53:57+5:30
वाद : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी राष्ट्रपती मुर्मु यांच्याबद्दल काढले अनुद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने राजकारण तापले असून, भाजपचे खासदार प्रचंड आक्रमक झाले आहेत. चौधरी यांनी केलेल्या अवमानकारक उल्लेखाबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली.
गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत हा मुद्दा तापला. राष्ट्रपतींच्या अवमानामुळे संपूर्ण देशात आक्रोश आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणतात की, चौधरी यांनी माफी मागितली. पण चौधरी म्हणतात, मी का माफी मागू?, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
नेमके काय घडले?
अधीर रंजन चौधरी यांनी २७ जुलै रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपतींचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला. त्यावरून गदारोळ माजला आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभेत काय घडले?
लोकसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. हीच मागणी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही केली. स्मृती इराणी यांच्या मागणीला भाजप खासदारांनी पाठिंबा दिला. चौधरी यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर दिवसभर हाच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राष्ट्रपतींचा अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. जे काही झाले ते केवळ अनावधानाने झाले आहे. मी बंगाली आहे. मला नीट हिंदी बोलता येत नाही. भाजप राईचा पर्वत करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी माफी मागेन, पण या ढोंगी लोकांसमोर माफी मागण्याचा संबंध नाही. काँग्रेस अध्यक्ष महिला असल्याने त्यांना भाजप लक्ष्य करीत आहे. त्यांना मी आव्हान देतो की, माझ्याशी लढावे. मला संसदेत स्पष्टीकरण देऊ द्यावे.
- अधीर रंजन चौधरी, लोकसभेतील
काँग्रेसचे गटनेते
काँग्रेस आदिवासीविरोधी आहे. महिला आणि गरिबांच्याही विरोधी आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने देशाच्या सर्वोच्च पदावर एका आदिवासी आणि गरीब परिवारातून निवडून आलेल्या महिलेचा अपमान केला आहे. या सर्व प्रकरणात सोनिया गांधी यांनी माफी मागावी.
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री