मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या शुक्रवारी संसदेत आपल्या कार्यकाळीत शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर संसदेतील विविध पक्षाच्या महिला खासदारांनी एकत्र जेवण केल्यानंतर काहीसा विरंगुळा म्हणून पारंपारिक फुगडी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाखासदार हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हरसिमरत कौर बादल यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, भाजपा खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कनीमोळी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल दिसत आहे. या सर्वजण एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना दिसल्या. तर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीचा फेर धरला आहे. यासोबतच, हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्विटमध्ये आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बालपणीची आठवण करुन दिली, असे म्हटले आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु केल्या आहे . मात्र, या तापलेल्या वातावरणातही विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदारांनी मिळून फुगडीचा फेर धरला. यामुळे राजकीय राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.