भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी महिनाभर केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बुधवारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य केलं. काँग्रेसने ट्विटरवर स्मृती इराणी यांचे पोस्टर शेअर केले असून त्यावर Missing असं लिहिलं आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत कुस्तीपटू त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. मात्र आतापर्यंत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी या संपूर्ण घटनेवर मौन बाळगलं आहे. काँग्रेस पक्षाने स्मृती इराणी बेपत्ता असल्याचं वर्णन करणारे सलग दोन ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी स्मृती यांच्यावर निशाणा साधला आहे.
स्मृती महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांवर केलेले ट्विट लपवतात, असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांच्यासोबत भाजपा मंत्री मीनाक्षी लेखी यांचाही एक फोटो आहे, ज्या महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांपासून दूर पळत असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या या Missing ट्विटला स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"हे दिव्य राजकीय प्राणी, मी सध्या अमेठी लोकसभा मतदारसंघातल्या सलोन विधानसभा मतदारसंघातील सिरसिरा गावाहून धुरनपूरच्या दिशेने निघाले आहे. जर तुम्ही माजी खासदारांना शोधत असाल, तर कृपया अमेरिकेत संपर्क करा" असं म्हणत स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसलाही प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबतच राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावरही टीका केली आहे.