नवी दिल्ली, दि. 10 - केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एक ओपन लेटर लिहून कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये सोनिया गांधींनी केलेल्या भाषणावर टीकास्त्र सोडलं आहे. इराणी यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर हे लेटर शेअर केलं आहे. भारत छोडोसारख्या ऐतिहासिक आंदोलनाच्या घटनेबाबत बोलताना आपले विचार योग्यपणे मांडणं गरजेचं होतं. मात्र, सोनिया गांधी 2014 मध्ये झालेल्या पराभवाचंच दुःख मांडत असल्याचं दिसलं असं इराणी म्हणाल्या. भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्षानिमित्त संसदेमध्ये विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना सलाम करत असतानाच सध्याच्या राजकारणावरही भाष्य केलं. देशामध्ये सध्या सुडाचं आणि विभाजनाचं राजकारण सुरू असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.देशातली लोकशाही सध्या धोक्यात आहे. स्वातंत्र्याचं बलिदान आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि हे वाचवण्यासाठी काम करावं लागेल, असंही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या भाषणात विकासाकडे लक्ष्य केंद्रीत करण्यात आलं होतं तर दुसरीकडे सोनिया गांधींचं भाषण म्हणजे निवडणुकीचा प्रचार असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली.