नवी दिल्ली - शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणी वादग्रस्त विधान केल्यामुळे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच नेटीझन्सकडून स्मृती इराणी यांना ट्रोलही करण्यात येत आहे. त्यानंतर, स्मृती इराणी यांनी आपल्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोसोबत 'हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है😂🤔🤦♀️' असे कॅप्शन देऊन नेटीझन्सना हटके अंदाजात उत्तर दिले आहे.
शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत बोलताना, प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असे नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. ब्रिटिश उप-उच्चायुक्त आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित यंग थिंकर्स कॉन्फरन्समध्ये बोलताना इराणी यांनी असे विधान केले होते. त्यानंतर, स्मृती इराणी यांना अनेकांनी टार्गेट केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करुन इराणी यांच्या वक्तव्याचा निषेधही नोंदवला होता. इराणींच्या वक्तव्यामुळे भाजपाची मनुवादी तसेच स्त्रीयांना कमी लेखण्याची मानसिकता दिसून येत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
मी स्वत: हिंदू आहे. मात्र माझे पती आणि दोन्ही मुले पारशी म्हणजे झोराष्ट्रीयन धर्माचे सदस्य आहेत. त्यामुळे मला त्यांच्यासोबत त्यांच्या प्रार्थनास्थळाला एकत्र भेट देता येत नाही. ही परिस्थिती मला पूर्णत: मान्य आहे. कारण मला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा, प्रार्थनेचा अधिकार मान्य आहे. कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, इराणी यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला न बोलता केवळ छायाचित्राच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
दरम्यान, स्मृती इराणी यांच्या या उत्तराचे काहींनी स्वागत केले आहे. तर अनेकांनी या उत्तरावरुन पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली आहे. स्मृती यांनी इंस्टाग्रामवरुन शेअर केलेला हा फोटो त्यावेळेसचा आहे, ज्यावेळेस त्या टेलिव्हीजन माध्यमात अॅक्टर म्हणून काम करत होत्या.