लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहेत. याच दरम्यान, अमेठीच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "तुम्ही या भागातील काँग्रेसचे राजकारण पाहिलं आहे. तुम्ही सर्वांनी गंभीर परिस्थितीत काँग्रेस गायब होताना पाहिली आहे. कोरोना व्हायरस आला तेव्हा काँग्रेस पक्षातील कोणीही लोकांमध्ये दिसलं नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.
अमेठीतील काँग्रेस उमेदवाराच्या घोषणेला होत असलेल्या विलंबाबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "यावरून आता काँग्रेस पक्षालाही कळलं आहे की अमेठीने पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण म्हणजे जर आपण काँग्रेस पक्षाची 50 वर्षे आणि राहुल गांधींची 15 वर्षे विरुद्ध भाजपा खासदाराची पाच वर्षे पाहा म्हणजे जमीन आसमानाचा फरक दिसेल."
"जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही. तुमची खासदार गावोगावी गेली हे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. कोरोनाच्या काळात मी गावोगावी फिरत होते. मी येथे जातीच्या आधारावर नाही तर अमेठीची एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुमचं समर्थन मागत आहे."
"अमेठीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 6 हजार रुपये मागितले नाहीत, मात्र पंतप्रधान मोदींनी ही रक्कम वाढवली. आज अमेठी लोकसभा मतदारसंघात 4 लाख 20 हजार कुटुंबांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. काँग्रेसची 50 वर्षे हुकुमशाही होती. अमेठीत वर्षभरात ते गरिबांसाठी शौचालयही बांधू शकले नाहीत. त्यांना (राहुल गांधी) शिंका आली तरी ते परदेशातील रुग्णालयात जायचे पण अमेठीत मेडिकल कॉलेजही बांधलं नाही" असं देखील स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.