ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कन्हैय्या कुमारने पाच मागण्यांसह आझादी मोर्चा काढला होता त्यावेळी ही मागणीदेखील करण्यात आली. यावेळी बोलताना कन्हैय्या कुमारने आपल्याला विद्यापीठातून काढून टाकण्यासंबंधी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलं आहे.
स्मृती इराणी यांनी राजीनामा द्यावा, सोबतच देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावेत, आमच्या 2 विद्यार्थ्यांची कारागृहातून सुटका करण्यात यावी, विद्यापीठाच्या स्वायत्ततेत ढवळाढवळ करु नये आणि विद्यापीठांमध्ये जातीय निवडणुकीविरोधात कायदा करण्यात यावा या मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. मला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे मात्र विद्यापीठातून काढून टाकण्यासंबंधी काहीच माहिती मिळाली नसल्याचं कन्हैय्या कुमारने सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 9 फेब्रुवारीला अफजल गुरुच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या चौकशीसाठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार, पीएचडीचा अभ्यास करणारा उमर खालिद आणि अर्निबन भट्टाचार्यचा समावेश आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नोटीसदेखील पाठवण्यात आली आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली सध्या उमर आणि अर्निबन न्यायालयीन कोठडीत आहेत तर, कन्हैया हंगामी जामिनावर बाहेर आहे.