नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर होत्या. २०१४ मध्ये अमेठीत पराभूत झालेल्या स्मृतींनी याच मतदारसंघात २०१९ मध्ये राहुल गांधींचा पराभव केला आणि लोकसभा गाठली. दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान स्मृती इराणींनी विविध भागांना भेटी दिल्या. त्या अमेठीतल्या एका प्रसिद्ध लस्सी दुकानात गेल्या. दुकानाच्या मालकासोबत संवाद साधताना त्यांनी एक व्हिडीओ चित्रित केला. इराणी आल्या असल्यानं त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तिथे असलेल्या काहींनी इराणी आणि दुकान मालकाचा व्हिडीओ चित्रित केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी स्मृती इराणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत इराणी अमेठीतल्या अशरफी लाल लस्सी कॉर्नर दुकानात बसलेल्या दिसत आहेत. दुकानाच्या मालकासोबतचा संवाद त्या मोबाईलवर रेकॉर्ड करत आहेत. 'तुमच्या दुकानात गांधी कुटुंबातील कोणी लस्सी प्यायला आलं होतं का?', असा प्रश्न स्मृतींनी दुकान मालकाला विचारला. त्यावर 'हो, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अनेक जण येऊन गेले आहेत,' असं उत्तर दुकान मालकानं दिलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काँग्रेसचे नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी स्मृती इराणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी इराणी आणि दुकानदारामध्ये झालेला संवाद ट्विटमध्ये नमूद केला आहे. देशात सगळं काही पहिल्यांदाच होतंय असं स्मृतींना वाटतंय, असा टोला त्यांनी ट्विटमधून लगावला आहे.