ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - आयआयटीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या पण पैशाअभावी आयआयटीत प्रवेश घेऊ न शकणा-या उत्तरप्रदेशमधील दोघा भावांना मनुष्यबळ विेकास मंत्री स्मृती इराणींनी दिलासा दिला आहे. स्मृती इराणींनी या दोघा भावांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
उत्तरप्रदेशमधील प्रतापगड येथे राहणारे धर्मराज हे मजूर म्हणून काम करत असून त्यांना राजू (वय १८ वर्ष) आणि बृजेश (१९ वर्ष) ही दोन मुलं आहेत. धर्मराज यांच्या कुटुंबात सात जणांचा समावेश आहे. हलाखीच्या परिस्थितीतही राजू व बृजेश या दोघा भावांनी आयआयटीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. राजूने परीक्षेत देशभरात १६७ वा तर बृजेश ४१० वा आला आहे. मुलांनी परीक्षेत यश मिळवल्यानंतर धर्मराज व कुटुंबातील अन्य सदस्यांना आयआयटीचे महत्त्व समजले. मुलांच्या या कामगिरीवर धर्मराज आनंदित होते. पण आता आयआयटीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश कसा करायचा असा प्रश्न धर्मराज यांना पडला होता. आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी त्यांना एक लाख रुपयांची आवश्यकता होती.
धर्मराज यांच्या मुलांच्या या यशोगाथेची माहिती ट्विटरवर शेअर करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. स्मृती इराणींनी तातडीने याची दखल घेत दोघांना भावांना फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय ट्यूशन फी व राहण्यासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी इराणींनी दोघांनाही शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही केली. इराणींच्या या निर्णयाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.