नवी दिल्ली- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी त्यांच्या दमदार भाषणाने किंवा सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच स्मृती इराणी यांच्या अभिनय कौशल्याचीही सगळ्यांना माहिती आहे. पण दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात स्मृती इराणी यांचं एक वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं. मंगळवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) पदवीदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क शिट्टी वाजवली. बिनधास्तपणे तोंडात बोट घालून जोरदार शिट्ट्या वाजवणाऱ्या स्मृती इराणींना पाहून विद्यार्थ्यांना क्षणभर आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनीही शिट्ट्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.
एनआयएफटी संस्थेचा पदवीदान सोहळा मंगळवारी स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडला. इराणी यांनी यावेळी विद्यार्थांना पदवी देऊन भाषण केलं. या भाषणात त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. एका विद्यार्थ्यानं फॅशनमधील तंगालिया या दुर्मिळ प्रकाराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. काळाच्या पडद्या आड जात असलेले हे कलाप्रकार वाचविण्यासाठी आपण पुढे आलात तर मला अभिमान वाटेल, असं यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या.
राहुल गांधीच्या ट्विटला दिलं होतं शरोशायरीत उत्तरकाही दिवसांपूर्वीच स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला शेरोशायरीच्या अंदाजात उत्तर दिलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या टीकेला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं. कवी दुष्यंत कुमार यांच्या “भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली मे जेरे-बहस ये मुद्दा” या ओळी ट्विट केल्या होत्या. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला. यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट केलं . ‘ऐ सत्ता की भूख-सब्र कर, आँकडे साथ नहीं तो क्या खुदगर्जों को जमा कर, मुल्क की बदनामी का शोर तो मचा ही लेंगे’ असं ट्विट करून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं होतं.