अमेठी - केंद्रीयमंत्री आणि अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या अत्यंत निकटवर्तीयाने काँग्रेससोब हातमिळवणी केली आहे. समाजवादी पक्षामध्ये मंत्री राहिलेले आणि सध्याचे भाजपा नेते रवि दत्त मिश्रा हे ऐन निवडणुकांच्या काळातच स्मृती इराणींच्या विरोधी गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे स्मृती इराणींसाठी हा मोठा धक्का मानला जातो. कारण, मिश्रा यांनीच स्मृती इराणींना अमेठीच्या राजकारणात आणल्याचे सांगण्यात येते.
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आणि स्मृती इराणींचे कट्टर समर्थक रवि दत्त मिश्रा यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. राहुल गांधींनी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यादिवशी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधींच्या उपस्थितीत दत्त मिश्रा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकांपूर्वी हा स्मृती इराणींना मोठा धक्का मानण्यात येत आहे. कारण, अमेठी हा स्मृती इराणींचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील स्मृती इराणींचे काम मिश्रा हेच पाहत होते. इराणींच्या गैरहजेरीत या मतदारसंघाची जबाबदारी त्याच्याकडे होती. विशेष म्हणजे, स्मृती इराणी अमेठीत आल्यानंतर मिश्रा यांच्या घरीच मुक्कामासाठी असतात, असे एका काँग्रेस नेत्यानं सांगितलं आहे. त्यामुळे मिश्रा हे स्मृती इराणींचे अत्यंत निकटवर्तीय होते, असे मानले जात. पण, मिश्रा यांनीच आता काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे, आता ते स्मृती इराणींच्या विरोधात आणि राहुल गांधींच्या समर्थनार्थ प्रचारात उभारतील हे नक्की.