काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला आहे. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
झोईश इराणीवर बनावट लायसन काढून बार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लायसन जून २०२२ मध्ये काढण्यात आले आहे. ज्याच्या नावे हे लायसन काढले त्याचा मे २०२१ मध्येच मृत्यू झाला आहे. १३ महिन्यांपूर्वी ज्याचा मृत्यू झाला त्याच्यानावे जूनमध्ये लायसन काढण्यात आले आहे. गोव्यातील कायद्यानुसार एका रेस्टॉरंटला एकदाच लायसन मिळू शकते. परंतू सिली सोल्स बारला दोन लायसन्स दिले आहेत, असा आरोप खेरा यांनी केला आहे.
याचबरोबर आणखी एक बेकायदेशीर बाब म्हणजे या रेस्टॉरंटला रेस्टॉरंट चालविण्याचे लायसन मिळालेले नाही, असे सांगत खेडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही सांगितले आहे. त्यांनी ही नोटीसही मीडियाला दाखविली आहे. यावर झोईश इराणी यांच्या वकिलांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहेत. झोईश यांचे अशा कोणत्याही रेस्टॉरंटशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी या आरोपांवर काँग्रेसवर टीका केली आहे.
सोनिया आणि राहुल गांधींच्या 5,000 कोटींच्या लूटप्रकरणी तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली, ही माझ्या मुलीची चूक आहे. मी राहुल गांधींना 2024 मध्ये पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देते, मी वचन देते की ते पुन्हा पराभूत होतील. माझी 18 वर्षांची मुलगी प्रथम वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि कोणताही बार चालवत नाही, असे त्या म्हणाल्या.