आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात लोकसभेत गुरुवारी शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसने म्हटले आहे की, स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी अयोग्य व अवमानकारक वर्तन केले. तथापि, सोनिया गांधी भाजपच्या खा. रमा देवी यांच्या जवळ गेल्या व अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या चुकीसाठी माफी मागितलेली आहे, हे सांगितले. एवढ्यात स्मृती इराणी यांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वतीने माफी मागावी. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, मी तुमच्याशी बोलत नाही. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले विरोधी पक्षांच्या व काँग्रेसच्या खासदारांनी ‘लोकमत’ला सांगितले की, त्यानंतर भाजपच्या महिला व पुरुष खासदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेत दिवसभर याच मुद्द्याची चर्चा सुरू होती.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, यासाठी भाजपने काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. काँग्रेसचे मीडिया सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही कोणती मर्यादा आहे? एक खासदार सहकारी खासदाराशी बोलूही शकत नाही का? स्मृती इराणी राजकीय पद्धतीने आपली बाजू मांडू शकतात. त्या एक वरिष्ठ खासदार व एका पक्षाच्या अध्यक्षांशी अशा हेकेखोर पद्धतीने का वागत आहेत? हे संसद व राजकीय मर्यादेच्या विरोधात आहे. राजकीय विरोध त्याच्या जागी असून, एखाद्या वरिष्ठ खासदारांशी अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का?
त्यांच्यावर टीका करण्याचा इराणींचा दीर्घ इतिहासn काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात गुरुवारी झालेला वाद पहिल्यांदाच झालेला नाही. दरवेळी सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्याचा स्मृती इराणी यांचा दीर्घ इतिहासआहे. n भाजप किंवा पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध सोनिया गांधी यांनी केलेल्या भाषणाचा किंवा वक्तव्यावर बोलण्याची जबाबदारी भाजप स्मृती इराणी यांना देते. भाजपच्या रणनीतीतील त्या सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या सर्वांत मोठे अस्त्र आहे.