नवी दिल्ली - मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी या सध्या केंद्रीयमंत्रीपद भूषवत देशाचा कारभार पाहात आहेत. मात्र, एकीकडे मंत्रीपदाची जबाबदारी असताना दुसरीकडे घरातील, कुटुंबातील सदस्यांचीही काळजी त्यांना घ्यावीच लागते. आई म्हणून दोन मुलांच्या संगोपनाची आणि त्यांच्या भविष्याची काळजी त्यांना असतेच. आता, त्यांचा मुलगा जोहरने नुकतेच पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यातून नुकतेच त्याने आपले पदवी प्रमाणपत्र घेतले. आई म्हणून स्मृती इराणींना हा झालेला आनंद त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
क्यों की सास भी कभी बहू थी... या मालिकेतून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या. त्यानंतर, त्यांनी राजकारणात येत भाजपच्यावतीने अनेक आंदोलनं केली. रस्त्यावर उतरुन तत्कालीन सरकारविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या या कार्यक्षमतेची दखल घेतच भाजपने त्यांना केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. आज केंद्रीयमंत्रीपदी विराजमान असतानाही त्यांच्यातील प्रेमळ आणि काळजीवाहू आईची झलक त्यांच्या इंस्ट्रागाम पोस्टवरुन दिसून येते. स्मृती इराणी यांनी मुलगा जोहरच्या पदवीदान सोहळ्याचा व्हिडिओ शेअर करत भावूक संदेश लिहिला आहे.
जोहर, तुझे ग्रॅज्युएशन एका नवीन आशावादी ध्येयाकडे लक्ष्य केंद्रीत करत आहेत. तू तुझ्या क्षमेतेनुसार जगावं, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा, जबाबदारीने जगावे आणि आयुष्यावर प्रेम करावे. मला तुझा अभिमान आहे. मी आज खूप आनंदी आहे. तुला खूप सारं प्रेम आणि देवाची कृपा तुझ्यावर बनून राहावी, असेही स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्मृती यांच्या या पोस्टमधून त्यांच्यातील प्रेमळ मातेचं दर्शन घडतं.