नवी दिल्ली - धुक्यामुळे अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता धुक्यामुळे ट्रेनला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी फोनवर एसएमएसच्या माध्यमातून ट्रेनचं लोकेशन सांगितलं जाईल. तसेच किती वेळात ट्रेन स्थानकात पोहचू शकते याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
थंडीच्या दिवसात धुक्यामुळे ट्रेन या लेट होत असतात. मात्र याचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. यंदा रेल्वे प्रशासनाने याची खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे लेट होणाऱ्या ट्रेन्सच्या संख्येत घट झाली आहे. यंदा 15 टक्के सुधारणा झाली असून 71 टक्के ट्रेन्स या आपल्या वेळेवरचं स्थानकात दाखल झाल्या आहेत. तसेच प्राथमिक सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या वेळेत बऱ्याच अंशी सुधारणा झाली आहे. ट्रेन आपल्या वेळेत स्थानकात पोहतच असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच थंडीच्या दिवसात धुक्याचा फटका रेल्वे सेवेला बसू नये यासाठी उत्तम खबरदारी घेण्यात येत आहे. साधारणत: 15 डिसेंबरनंतर रेल्वेला धुक्याचा फटका बसण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रेनमध्ये धुक्यापासून वाचण्यासाठी फॉग सेफ्टी डिव्हाईस लावण्यात आले आहे. लोको पायलटला फॉग सेफ्टी डिव्हाईसच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युअल क्यू सिग्नल देतील. ते सिग्नल जवळ येतच ट्रेनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाईस काम करणार आहे.
प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे. प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे.