बिलासपूर: अभिनेता अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात दाखविण्यात आलेल्या लाल चंदनाच्या तस्करीची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. पण, आता छत्तीसगडमध्ये पांढर्या चंदनाच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर पोलीस स्टेशन परिसरात 5 लाख रुपये किमतीचे पांढरे सुगंधित चंदन जप्त करण्यात आले आहे. बसमधून हे पांढरे चंदन उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न तस्कर करत होते.
या ठिकाणी होते पांढऱ्या चंदनाची लागवडबिलासपूर जिल्ह्याला लागून असलेल्या गौरेला पेंद्र मारवाही आणि कोरिया जिल्ह्याच्या जंगलात पांढरे चंदन उगवले जाते. आतापर्यंत या भागात पांढऱ्या चंदनाच्या तस्करीच्या घटना होत नव्हत्या. पण, बुधवारी सायंकाळी काही जण या प्रतिबंधित चंदनाची तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
या माहितीच्या आधारे रतनपूर पोलिसांनी परिसरात तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान पोलिस पथक रतनपूर बसस्थानकावर आले असता सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास काही चंदनाने भरलेली पोती टाकून पळून गेले. पोलिसांनी तस्करांचा पाठलाग केला, पण अंधार आणि धुक्याचा फायदा घेत तस्कर पसार झाले.
या भागात आढळतात चंदनाची झाडे
रतनपूर पोलिसांनी सांगितले की, तस्करांकडून 100 किलो पांढरे चंदन जप्त करण्यात आले आहे. याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. या पांढऱ्या चंदनाची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे. गोरेला पेंद्र मारवाही, कोरिया, सुरगुजा सीमावर्ती जिल्ह्यांतील जंगलात पांढर्या चंदनाची झाडे आढळतात. परिसरात चंदनाची तस्करी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या तस्करांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
चंदनाचा उपयोग कुठे होतो ?
भारतात आणि भारताबाहेरही चंदनाच्या लाकडाला मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत पुष्पा चित्रपटात दाखवण्यात आलेल्या लाल चंदनाची तस्करी व्हायची. पण, आता ती बंद झाली आहे. तर, हे पांढरे चंदन लहान तुकड्यांमध्ये बाजारात विकले जाते. याशिवाय पांढर्या चंदनाचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि पूजेच्या साहित्यात केला जातो.