उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विकास दुबेला ४० दिवसांत सात वेळा साप चावला आहे. वनविभागासह आरोग्य विभागाचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांच्या तपासणीनंतर विकास दुबे याच्या अंगावर असलेल्या सात सर्पदंशाच्या खुणांपैकी सहा सर्पदंशाच्या खुणा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विकास दुबे याला पहिल्यांदाच साप चावला होता. त्यानंतर जे काही सर्पदंश दाखवले जात आहेत ते संशयास्पद आहेत.
विकासवर उपचार करणाऱ्या डॉ. जवाहरलाल यांचा जबाबही तपास रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे. उपचारात चार वेळा अँटी-वेनमचा सामान्य डोस दिल्याचं सांगितलं आहे. चौकशीदरम्यान तपास पथकाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जवाहरलाल यांना विचारले की, विकास दुबेला कोणत्या प्रजातीचा साप चावला होता. त्यावर डॉ. जवाहरलाल म्हणाले की, मला सापाची प्रजाती माहीत नाही. विकास आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून, मी त्याच्यावर सात वेळा उपचार केले आणि चार वेळा त्याला अँटी वेनमचा नॉर्मल डोस दिला.
आरोग्य विभागाच्या पथकाने पुन्हा डॉ. जवाहरलाल यांना विचारलं की, तुम्हाला सापाच्या प्रजातीची माहितीच नाही, मग तुम्ही अँटी वेनमचा डोस कसा दिला? त्यावर डॉक्टर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. वनविभागाचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. डीएफओ रामानुज त्रिपाठी यांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात विकास दुबे व्यतिरिक्त कोणीही साप पाहिला नसल्याचं समोर आलं आहे. विकास दुबेला साप चावला त्या ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली, मात्र तेथे साप आढळून आला नाही.
विकास दुबेने सांगितलं की, ४० दिवसांत मला सातवेळा साप चावला. त्याने स्वतः ते तीन वेळा पाहिलं. आतापर्यंतच्या तपासात प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद वाटत आहे. विकास दुबे हा मलवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावचा रहिवासी आहे. विकास दुबेने दावा केला आहे की, ४० दिवसांत सात वेळा साप चावला आहे. प्रत्येक वेळी साप चावण्यापूर्वी त्याला धोक्याची सूचना देतो. त्याला शनिवार आणि रविवारीच साप चावला आहे.