कोची - लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरातील 117 मतदारसंघात मतदान होत आहे. त्यासाठी, मतदान केंद्रांवर अनेक हटके नियोजन केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, केरळच्या कन्नूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील नियोजनच बिघडलं आहे. येथील मतदान केंद्रावर चक्क नागोबाच मतदान करायला पोहोचले. त्यामुळे उपस्थित मतदारांची धांदल उडाली.
देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. कन्नूर मतदारसंघातील मय्यील कंडाक्काई मतदान केंद्रावरील एका व्हीव्हीपॅट मशीनच्या आतमध्ये छोटा साप आढळला. त्यानंतर, मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. निवडणूक अधिकारी अन् मतदारांमध्ये भिती पसरली. मात्र, काही वेळातच या सापाला बाहेर काढण्यात आले व मतदान सुरु झाले. कन्नूरमध्येही नागरिकांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत असून पंतप्रधान मोदी, अमित शहा, अरुण जेटलींसह दिग्गज नेत्यांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.