जबलपुर–मुंबई गरीब रथ ट्रेनमध्ये आज एक थरकाप उडविणारी घटना घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये अचानक साप आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एसी कोच नंबर १२१८८७ मध्ये अचानक सापाच्या हालचाली सुरु झाल्या. सापाला पाहताच प्रवाशांना धडकी भरली. त्यांनी इतर प्रवाशांना सीटवरून उठवत बाजुला केले. यावेळी प्रवासी गरीब रथमध्ये साप कुठून आला, असे बोलताना व्हिडीओत ऐकायला येत आहे.
हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनेही सरकारवर टीका केली आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांसोबत एक सापही प्रवास करत आहे. लोकांच्या आयुष्यात किती धाडसी क्षण द्यायचे आहेत? ट्रेनमध्ये तिकीट द्या, साप नको असे काँग्रेसने हा व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे. किमान प्रवाशांच्या सुरक्षिततेची काही हमी तरी घ्या, असेही सुनावले आहे.
प्रवाशांनी ब्लँकेटद्वारे सापाला गुंडाळण्याचा प्रयत्न केला, परंतू साप वरील एसी पॅनेलमध्ये घुसल्याने काहीच करता येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलविले व साप असेलेली बोगी लॉक केली आहे.