गेल्या तीन दिवसांपासून अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक विषयांतर करत केवळ मोदीजींवर टीका करत आहेत. त्यांचा टोन सांगतो की, त्यांना नरेंद्र मोदी यांचा चेहराच पसंत येत नाहीय. मात्र आपण तरी काय करू शकता. देशातील जनतेने त्यांच्या नावावर मतदान केले आहे. हे पीएम मोदींचे यश आहे की, 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला तिसऱ्यांदा सत्ता सांभाळण्याची संधी मिळाली. आमचा एक सल्ला आहे की, सत्य जेवढ्या लवकर स्वीकाराल तेवढे चांगले आहे, असे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी म्हटले आहे. ते सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलत होते.
काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागांवरूनही ललन सिंह यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "हे केवळ पहिले वर्ष आहे. आणखी 5 वर्षे बाकी आहेत. काय होते ते बघा. सध्या तुमचे 99 आहेत. 5 वर्षांनंतर पुन्हा साप चावेल आणि शून्यावर पोहोचाल. जेडीयू आणि टीडीपीला 5 वर्षांसाठी जनादेश मिळाला आहे. अनेक पक्ष म्हणाले की, दोन राज्यांना खुश करण्यात आले आहे. हे कसले बोलणे आहे की, सरकार वाचवणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही तर तुम्हालाही बघितले आहे."
राजीव रंजन उर्फ लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो. या लोकांना सत्य आवडत नाही, म्हणून ते गोंधळ घालत आहेत, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.