श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करण्यास तसेच लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे.
दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी अमरनाथ यात्रेच्या भाविकांवर स्नायपर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलाच्या जवानांनी हा हल्ला उधळून लावला, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानचे लष्कर सतत काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा सर्च ऑपरेशन दरम्यान भुसुरुंग सापडले. मात्र, त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी केले आहेत. काश्मीर घाटीतील स्थिती सुधारली आहे आणि दहशतवाद्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे, असे ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशन दरम्यान एक अमेरिकन स्नायपर एम-24 सापडले. याशिवाय पाकिस्तानात बनविण्यात आलेले भुसुरुंग आणि इतर स्फोटकं सापडली आहेत.'