ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सैनिकांमध्ये झालेली झटापट आणि वर्षांनुवर्षे चालू असलेला सीमावाद यामुळे भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. हा संपूर्ण विवाद डोकलाम येथील पठारी भागावरील हक्कासंदर्भात आहे. हा भाग भूतानचा असून, चिनी त्याच्यावर आपला हक्क सांगत असतात. दरम्यान, 16 जूनला चीन आणि भूतानच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्यानंतर भारतीय सैनिक भूतानी सैनिकांना मदत करण्यासाठी तेथे पोहोचले. मात्र तोपर्यंत चीनी सैनिक तेथून माघारी गेले होते.
डोकलामबाबत भूतान आणि चीन यांच्यात 1984 पासून विवाद सुरू आहे. दोन्ही देशात या प्रश्नी चर्चेच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत हा विवाद सुटू शकलेला नाही. चिनी सैनिक या भागात गस्त देण्यासाठी येत असतात, मात्र ते माघारीही जातात. दरम्यान 16 जूनला चीनी सैनिक बांधकाम करणाऱ्या पथकासह मशीन आणि वाहने घेऊन या भागात घुसले. चीनी सैन्याकडून अशी हालचाल याआधी कधीही दिसली नव्हती. त्यांनी रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यावर भूतानच्या सैनिकांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. तसेच त्यांचे हे एकतर्फी पाऊल 1988 आणि 1998च्या कराराचे उल्लंघन असेल, असेही चीनी सैन्याला बजावण्यात आले.
चीनी सैनिक जो रस्ता बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने भारत आणि भूतानची चिंता वाढवणारा आहे. कारण या परिसरापासून भारताला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर केवळ काही किलोमीटर अंतरावर आहे.