लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकांत विरोधकांनी एकजूट दाखवून एकास एक उमेदवार दिला तर ही निवडणूक भाजपला अतिशय कठीण जाईल, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने अनेक राज्यांत मोठा विजय मिळविला होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांत करता येणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भाजपप्रमाणेच काँग्रेस हादेखील राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या काही भागांमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचे बळ अधिक आहे. काँग्रेसला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे अस्तित्व प्रत्येक राज्यात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी किंवा सरकार स्थापन करताना कोणालाही काँग्रेसचा विचार हा करावाच लागेल. २०१९नंतर देशाच्या राजकीय स्थितीत खूप बदल झाले आहेत. बिहारमध्ये सत्तेत भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यू)ने आता वेगळ्याच पक्षांशी हातमिळवणी केली आहे. देशात प्रस्थापित सरकारविरोधी लाट असून, त्याचा तडाखा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये बसेल, असे ते म्हणाले.
‘भारत जोडो’ने काँग्रेसला आत्मविश्वास दिला’भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा संपूर्णपणे बदलली इतकेच नव्हे तर या यात्रेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आत्मविश्वास प्रदान केला, असेही काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी सांगितले.