नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने उत्तरांखड येथील 40 पदाधिकारी आणि सदस्यांना घरचा रस्ता दाखवला होता. उत्तराखंड राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय पातळीवरील आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर, आणखी 50 कार्यकर्त्यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत 90 पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांवर भाजपाकडून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षाने ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त एएनआय या संस्थेनं दिलं आहे. विशेष म्हणजे या यादीत महामंत्री पदावरील व्यक्तींचाही समावेश आहे. भाजपाने केलेल्या कारवाईत कार्यकर्त्यांपासून ते बुथप्रमुख, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, मीडिया प्रमुख यांसह महामंत्री पदांच्या व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यातील पोटनिवडणुकांच्या उमेदवारी घोषणेनंतर पक्षविरोधी कार्यवाहीची दाट शक्यता आहे. तसेच, अनेकजण बंडखोरीही करू शकतात. त्यामुळे, भाजपाने उत्तराखंडमध्ये 90 सदस्यांना पक्षातून काढून एक धडा दिला आहे.
नुकतेच भाजपाने विविध राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 62 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच, महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांसाठीही उमेदवारांची यादी जाहीर केली असून सर्वच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे.