...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:16 AM2023-07-31T06:16:21+5:302023-07-31T06:17:21+5:30
"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे."
इम्फाळ : मणिपूरमधील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेला जातीय संघर्ष लवकर सुटला नाही तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीचे २१ खासदार शनिवारपासून मणिपूरच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल अनुसुया उइके यांची भेट घेतली. तसेच, इशान्येतील या राज्यातील परिस्थितीबाबत एक निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बैठकीनंतर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर सहमती दर्शविली. त्यावर राज्यपाल उइके म्हणाल्या की, मैतेई आणि कुकी समुदायांमधील अविश्वास संपविण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट दिली पाहिजे. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
पीडितांची विचारपूस
- दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, शिष्टमंडळाने बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग आणि चुराचांदपूर येथील अनेक मदत छावण्यांना भेट दिली तसेच जातीय संघर्षाची झळ बसलेल्या लोकांच्या भेटी घेतल्या.
- मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले.
- या शिष्टमंडळाने काही शिबिरांना भेट देऊन विचारपूस केली. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे सदस्य दुपारी दिल्लीला रवाना झाले.
या भागात अशी परिस्थिती आहे की, खोऱ्यातील मैतेई लोक कुकी राहत असलेल्या डोंगराळ प्रदेशात जाऊ शकत नाहीत आणि डोंगराळ प्रदेशातील लोक खोऱ्यात येऊ शकत नाहीत. धान्य, दूध, मुलांचे भोजन आणि अन्य आवश्यक वस्तूंची टंचाई आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. - अधीर रंजन चौधरी, काँग्रेस नेते
केंद्र सरकारला संसदेत चर्चा करण्याचे आवाहन
चौधरी यांनी सांगितले की, खासदारांनी मणिपूरमध्ये जी परिस्थिती पाहिली त्याबद्दल ते संसदेत अहवाल सादर करतील आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मणिपूरमधील राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकांवर आम्ही संसदेत बोलू. आम्ही केंद्र सरकारला या विषयावर संसदेत चर्चा करण्याचे आवाहन करतो.
तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलेलेच
मणिपूर तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून अशांत आहे. मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हा संघर्ष पेटला हाेता. यामुळे राज्यातून हजाराे लाेक स्थलांतर करीत आहेत. कुकी समुदायाने स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. दाेन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. संसदेतही यावरून प्रचंड गदराेळ झाला.