सिरसा - हरियाणामधील सिरसा जिल्ह्यात आम आदमी पक्षाच्या नेत्याच्या पत्नीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मुलांसह स्वत:साठी इच्छामरणाची मागणी केली आहे. आपचे येथील अध्यक्ष हंसराज सामा यांची पत्नी बिमला देवी यांनी उपायुक्तांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामधून त्यांनी सिरसा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.पोलिसांवर गंभीर आरोप करताना बिमला देवी यांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांचे पती हंसराज सामा, दोन मुलगे आणि सुना यांना कलम ३२६ अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय आणि निष्पक्ष पद्धतीने तपास करण्यात यावा, अशी मागणी बिमला देवी यांनी केली आहे.या पत्रात त्या लिहितात की, गेल्या २८ नोव्हेंबर रोजी कंगनपूर रोज जवळील एफसीआयच्या गोदामात त्यांचे आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या भांडणात कुणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र असे असूनही पोलिसांनी मेडिकल रिपोर्टच्या आधारावर हंसराज सामा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला होता.बिमला देवी यांनी सांगितले की, भांडणावेळी तिथे उपस्थित असलेल्या आजूबाजूला अनेकजण उपस्थित होते. त्यांनीसुद्धा लिखित शपथपत्र देऊन कुठल्याही शेजाऱ्याला दुखापत झाली नसल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी निष्पक्षपणे तपास करण्यात यावा किंवा आपल्याला आपल्या अल्पवयीन मुलांसह इच्छामृत्यू द्यावा, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
...म्हणून आपच्या नेत्याच्या पत्नीने मुलांसह राष्ट्रपतींकडे मागितले इच्छामरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 1:57 PM